ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृह प्रवेश
पुणे : पुण्यात उच्चशिक्षणासाठी येणा-या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनासाठी येथील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळू शकतो, गेली त्रेसष्ठ वर्षे ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. विद्यार्थी सहायक समितीच्या प्रवेश प्रक्रियेला १ जून पासून सुरवात झाली आहे.
संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृहे असून सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३२० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहाटे योगासने, कमवा व शिका योजनेत सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्व विकासाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडल्याचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणा-या आर्थिक मदतीवर सुरु असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.
गरजू विद्यार्थी–विद्यार्थीनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक १ जूनपासून ऑनलाईन www.samiti.org या संस्थेच्या वेबसाईटवर तसेच कार्यालयात (सकाळी ११ ते सायं. ४ वा.) मिळतील. संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे : (मुलींचे वसतिगृह), डॉ.अ.श.आपटे वसतिगृह, विद्यार्थी साहाय्यक समिती, ११८२/१/४, शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलिस ग्राऊंड जवळ, बॅंक ऑफ महाराष्ट्र ’यशोमंगल’ शेजारी, पुणे – ४११००५ फोन: (०२०) २५५३३६३१, (मुलांचे वसतिगृह), लजपतराय विद्यार्थी भवन, १०३अ, शिवाजी हौ.सो.मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे–४११०१६.फोन: (०२०) २५६३९३३० येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.