पुणे : “देशाचे माजी राष्ट्रपती, अनेक अवकाश मोहिमा यशस्वी करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणजे अखंड प्रेरणेचा स्रोत आहे. ‘मिसाईल मॅन’ अशी ओळख असलेल्या डॉ. कलाम यांचा सहवास आम्हाला सतत प्रेरणा देत असे. डीआरडीओमध्ये कलाम यांचे योगदान मोठे असून, त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांच्या विचारांना सर्वांपर्यंत पोहोचवण्यात या प्रदर्शनामुळे मदत होईल,” असे मत डीआरडीओच्या एसीईचे डायरेक्टर जनरल प्रवीण कुमार मेहता यांनी व्यक्त केले.
साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने व वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने १४ ते १६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या ‘कलाम पर्व’ या फोटोबायोग्राफी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी प्रवीण कुमार मेहता बोलत होते. याप्रसंगी डीआरडीओचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ. सुभाषचंद्र सती, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विज्ञानभारतीचे सहकार्यवाह मुकुंद देशपांडे, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, पुणे महापालिकेतील विधी सल्लागार मंजुषा इदाते, संयोजक कैलास भिंगारे आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत पुणेकर विज्ञानप्रेमींना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
डॉ. सुभाषचंद्र सती म्हणाले, “पृथ्वी, आकाश, अग्नी, नाग व त्रिशूल या क्षेपणास्त्रांच्या मोहिमेत त्यांचे योगदान मोठे आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या कलाम यांनी राष्ट्रपतीपदापर्यंत झेप घेतली. त्यांचा हा प्रवास आपल्या सर्वाना प्रेरणादायी आहे. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सगळ्यांचा प्रभावित करणारी आहे. निःस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती नेहमीच प्रगतीपथावर नेणारी होती. त्यांच्या मनात कोणत्याच गोष्टी अहंकार नव्हता. टीमवर्क साधण्याची त्यांची कला, डीआरडीओ आणि कंपनी यांना जोडण्याचे त्यांचे कसब आम्ही जवळून अनुभवले आहे.”
कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई, प्रकाश जोशी यांनीही आपले विचार मांडले. तरुणांना स्फूर्ती देणारे हे प्रदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले. कैलास भिंगारे यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.