‘एहसास’मधून मात्या-पित्यांना वंदन
विदर्भ महेश मंडळातर्फे श्री रामदेवबाबांचा जम्मा महोत्सव उत्साहात
पुणे : आपल्याला जन्म देणाऱ्या, आयुष्यात उभे राहायला शिकवणाऱ्या आणि माणूस म्हणून घडविणाऱ्या माता-पित्यांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी ‘एहसास’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मातापित्यांचे विधिवत पूजन करून त्यांनी केलेल्या कमाविषयी मुलामुलींनी पालकांचे आभार मानले. या अनोख्या कार्यक्रमामुळे आईवडिलांसह मुलेही भावुक झाली होती.
निमित्त होते, ‘पीरो के पीर रामापीर, बाबाओ के बाबा रामदेव बाबा’ अशी ओळख असलेल्या आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार समजल्या जाणाऱ्या राजस्थानच्या पोखरण येथील श्री रामदेवबाबा यांच्या ‘जम्मा’ महोत्सवाचे. विदर्भ महेश मंडळाच्या वतीने श्रीराम नवमीच्या निमित्ताने या ‘जम्मा’ महोत्सवाचे आयोजन केले होते. बाणेर येथील माउली गार्डन येथे झालेल्या या महोत्सवात भगवान श्री रामदेवबाबा यांचे पूजन, भजन, कथा पारायण, महाप्रसाद यामुळे वातावरण भारावून गेले होते. विदर्भातील प्रसिद्ध जम्मा गायक जय जोशी यांचे गायन झाले.
संपूर्ण राजस्थानी आणि माहेश्वरी समाजाचे आराध्य दैवत म्हणून रामदेवबाबा परिचित आहेत. दरवर्षी त्यांच्या जम्मा महोत्सवाचे आयोजन केले जाते. ५६ प्रकारचे भोग अर्पण केले जातात. सजावटीने (झाकी) परिसर फुलून जातो. विदर्भ महेश मंडळाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये वारकरी सेवा, रक्तदान, शैक्षणिक मदत, होलीमिलन कार्यक्रम आदींचा समावेश असतो.
या महोत्सवानिमित्त मुख्य यजमान मदनमोहन राठी, आनंद जाखोटिया, जयगोविंद झंवर, अशोक करवा यांच्यासह विदर्भ महेश मंडळाचे अध्यक्ष राजेश मालानी, कोषाध्यक्ष विनीत राठी, उपाध्यक्ष उमेश काळे, पद्मा लोहिया, गोपालदास भुतडा, गौरव गट्टानी, शाम भुतडा,आकाश करवा, विपुल नावंदर, मनोज भट्टड आदी उपस्थित होते.