तळजाई टेकडीवर गोळा झाला एक पोते पतंग-मांजा
पुणे : “पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा अनेकांसाठी गळफास ठरत आहे. त्यामुळे शालेय मुलांसह तरुणांनी ‘मांजा हटाव जान बचाव’ ही मोहीम शाळाशाळांत राबवली पाहिजे. या उपक्रमात माझा संपूर्ण सहभाग राहील. मांजामुळे जखमी होणाऱ्या प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान, गुरुवर विद्या परम रेसक्यु ऑपरेशनतर्फे बचावकार्य राबवले जाते. तरुणांनी या बचावकार्यात सहभागी व्हावे,” असे सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी सांगितले.
‘मांजा हटाव जान बचाव’ या उपक्रमाअंतर्गत तळजाई टेकडीवरील कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम सहकारनगर पुणे येथे टेलर्स ऑर्गनायझेशन, समग्र नदी परिवार (महाराष्ट्र), माय अर्थ फाऊंडेशन, ध्यास प्रतिष्ठान व जाणीव जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. कल्याण गंगवाल बोलत होते. जेष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार सुनिल जी माळी. लिज्जत पापडचे सुरेश कोते, लोकेश बापट, मुकुंद शिंदे, सोमनाथ पाटील , अनंत घरात, ईश्वर कसबे, अजय खरात, गोखले काका, सौ जान्हवी बापट आदी उपस्थित होते.
तुम्ही पर्यावरण वाचवले, तर पर्यावरण तुम्हाला वाचवेल. त्यामुळे नदी स्वच्छता आणि पतंगाचा चिनी मांजा हटाव या मोहिमा राबवाव्यात, असे डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले. या उपक्रमांतर्गत चिनी मांजा न वापरणे, जखमी पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करणे, झाडावर लटकणारा मांजा काढणे यासाठी नागरिकांना आव्हान करण्यात आले. कार्यकर्त्यांनी तळजाई टेकडी परिसरातील झाडांवर लटकणारे पतंग आणि मांजा गोळा केले. रोज फिरायला येणार्या लहान मुलांनीही यात सहभाग घेतला. तीनशेपेक्षा जास्त पुणेकरांनी या उपक्रमास पाठींबा दर्शविला.