पुणे,: मोटारसायकलवर आंतराष्ट्रीय सीमा ओलांडून जाण्याचे स्वप्न अनेकांचे असते. त्यातील थरार काही वेगळाच असतो. हा थरार अनुभवण्यासाठी द सिल्क ओडिसी २०१७ ने भारत ते लंडन येथील एस कॅफे अशी मोहिम हाती घेतली आहे. ही टीम कमीत कमी प्रवास करणार असून एेतिहासिक मार्गाने जाणार आहे. १३७ दिवसात १९ देशांना भेटी देणार आहे. अहमदाबाद येथून हा प्रवास सुरू होत असून पुण्यापासून पुढे जाणार आहे अशी माहिती पुण्यातील पहिले स्पोर्टेनमेंट डेस्टिनेशन क्लब २९ चे संचालक जयंत कनेरिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
म्यानमार, चीन, किरगिझस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि रशिया असा हा मार्ग असेल. हा प्रवास अतिशय विलक्षण असणार आहे ज्यामध्ये मृत्यूला देखील सामोरे जावे लागेल. हा एक जागतिक विक्रम ठरू शकेल, असे कनेरिया म्हणाले.
या रायडर्समध्ये कुमार शहा (वय ५५), राहुल अमीन (वय ४६), दिनेश दावडा (वय ४७) आणि डाॅ. भावीन कोडिआतार (वय ३६) यांचा समावेश आहे. यातील कुमार आणि दिनेश यांना शारीरिक अपंगत्व असून राहूलला शरीराच्या एका बाजूला विकलांग पक्षाघाताचा झटका आलेला आहे. अशा विशाल मोटारसायकल मोहिमेचे आयोजन करण्याची देशातील पहिलीच वेळ असून ही मोहिम मार्च २०१७ मध्ये होणार आहे.
ही टीम सर्व देशातील शहरांमधील अपंगांची भेट घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. शारीरिकदृष्ट्या अपंगांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. शारिरीक अपंगत्व तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यापासून रोखू शकत नाही यावर रायडर्सचा विश्वास आहे.
कनेरिया म्हणाले, ‘’माझा भाऊ देखील शारिरीक अपंगत्वाने पिडीत आहे. त्यामुळे मी अशा लोकांचे जीवन खूप जवळून पाहिले आहे. मी या सामाजिक मोहिमेचे समर्थन करतो. ही मोहिम अपंगत्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल याची खात्री आहे. द सिल्क ओडिसी २०१७-१८ या मोहिमेचा भाग होता येत असल्याचा आनंद होत आहे.’’