पुणे ः
बारामती तालुक्यात बलात्कार झालेल्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शिक्षण आणि संगोपनासाठी ‘अँटी करप्शन अॅण्ड क्राईम कंट्रोल’ या स्वयंसेवी संस्थेने दत्तक घेतले आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने मिहीर कुलकर्णी, उज्ज्वला हावरे यांनी दिली.
या मुलीवर रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी बलात्कार झाला होता. या गुन्ह्यातील 30 वर्षीय व्यक्तीला पोलीसांनी अटक केली आहे. चॉकलेट देण्याच्या अमिषाने त्याने या मुलीला दूर नेऊन बलात्कार केला होता.
राज्यातील बलात्कारीत, पीडित आणि अत्याचार झालेल्या युवती, अल्पवयीन मुली तसेच महिलांना मदत करण्यासाठी ‘अँटी करप्शन अॅण्ड क्राईम कंट्रोल’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘श्रद्धा’ ही हेल्पलाईन सुरू करण्याचे काम अंतीम टप्यात आहे.
बारामतीमधील घटनेची माहिती मिळताच संस्थेने पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून मदतीचा धनादेश दिला आणि पुढील शिक्षण, संगोपनासाठी मुलीला दत्तक घेतले.
या हेल्पलाईनच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. विजय भटकर, अॅड.उज्ज्वल निकम आणि सिंधुताई सपकाळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्घाटन दिनांक 6 नोव्हेंबर 2016 रोजी सिध्दी गार्डन, डी.पी.रोड, कर्वेनगर, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.