पुणे-कुख्यात गुंड श्याम दाभाडे व धनंजय शिंदे हे आज (मंगळवारी) सकाळी पोलीस चकमकीत ठार झाले…या प्रकाराने पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि ,कुख्यात गुंड श्याम दाभाडे व धनंजय शिंदे तथा तांबोळी यांना पोलीस पथक पकडण्यास गेल्यावर त्यांनी पथकावर गोळीबार केल्याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोघेही मृत्युमुखी पडले. त्यांच्या हातातील दोन कट्ट्यांसह पिशवीत चार गावठी पिस्तूल, एक कट्टा व 7.65 एमएमची 42 जिवंत काडतुसे व आठ एमएमची दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (वय 38, रा. तळेगाव दाभाडे) हे त्यांच्या मालकीच्या मर्सिडिस कारमधून खांडगे पेट्रोल पंप ते कडोलकर कॉलनी अंतर्गत रोडने जात असताना श्याम रामचंद्र दाभाडे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर साथीदारांमार्फत कार अडवून सचिन शेळके यांच्यावर कोयत्याने डोक्यात गळ्यावर व छातीवर वार करून तसेच पिस्तूलातून गोळीबार करून जिवे ठार मारल्याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात 15 आरोपींना अटक करण्यात आली असून टोळीप्रमुख व मुख्य सूत्रधार श्याम दाभाडे व त्याचे इतर काही साथीदार गुन्हा घडल्यापासून फरारी होते. मुख्य सूत्रधार श्याम दाभाडे याच्यावर यापूर्वी खून अपहरण खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे 19 गुन्हे दाखल असून त्याला रोख रक्कम व बेकायदा अग्निशस्त्रे बाळगण्याची सवय होती.कुख्यात गुंड श्याम दाभाडे व धनंजय शिंदे यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना सूचना दिल्या होत्य. त्याप्रमाणे डॉ. जय जाधव यांनी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांना श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांना त्वरित जेरबंद करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेने वेळोवेळी शोध घेऊनही ते सापडले नाहीत.
राम जाधव व त्यांच्या पथकाला काल (29 नोव्हेंबर) खात्रीशीर माहिती मिळाली की, श्याम व त्याचा साथीदार चाकणजवळील आंबू डोंगरावर जंगलात वास्तव्यास आहे. पहाटे दोन वाजल्यापासून जंगलात शोध घेत असताना सकाळी आठच्या सुमारास आंबू डोंगराजवळील पवनचक्कीजवळ एक तंबू ठोकलेला दिसला. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे व फौजदार अंकुश माने यांनी दाभाडे व शिंदे यांना पाहिले व ओळखले. पोलिसांना शरण या, असे सांगितले असता दोघांनी कमरेस खोचलेले पिस्तूल बाहेर काढून पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. तेव्हा पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथून उंच सखल भूभागाचा आडोसा घेतला. पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी मोठ्याने ओरडून पुन्हा एकदा त्यांना शरण येण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी जुमानले नाही. उलटपक्षी आक्रमक होऊन दाभाडे व शिंदे यांनी बेकायदेशीर पिस्तूलमधून पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. त्यावेळी पोलीस निरीक्षक राम जाधव व सहायक पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी स्वसंरक्षणार्थ व पथकाच्या संरक्षणार्थ शासकीय पिस्तूलमधून अनुक्रमे दोन व तीन फैरी झाडल्या. त्यात ते दोघे जखमी होऊन खाली पडले. त्यांना तातडीने निशस्त्र करण्यात आले. त्यावेळी श्याम दाभाडे याच्या कमरेला आणखी एक अग्निशस्त्र काडतुसांसह आढळून आले. तसेच पिशवीत चार पिस्तुलांसह हत्यारे व जिवंत काडतुसे सापडली.
दोघांना जखमी अवस्थेत चाकण येथे औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनाही कळविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. केदारी यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. वरील प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे , तानाजी चिखले यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सतीश होडगर, राजेश रामाघरे, विनोद घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, पोलीस कर्मचारी विजय पाटील, किरण अरुटे, विशाल साळुंखे, चंद्रकांत वाघ, सचिन मोरे व कोकणी यांच्या पथकाने ही कारवाई केली.