पुणे- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचची राज्यव्यापी बैठक येथे संपन्न झाली. राज्यातील सर्व महिला अधिका-यांपर्यंत पोहोचण्यासाठी दुर्गा महिला मंचची सर्व जिल्हयात स्थापना करण्यासह इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ही 72 अधिकारी संघटनांची मान्यताप्राप्त शिखर संघटना आहे.
बैठकीत पुढील मागण्या व विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. महिला कर्मचारी व अधिकारी यांना प्रसूती रजा व्यतिरिक्त,6 महिन्याची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात आल्याबद्दल शासनाचे आभार मानणारा ठराव मंजूर करण्यात आला.
महिला कर्मचारी-अधिकारी यांचा कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळासंबंधी तक्रार निवारण समितींचा आढावा सर्व जिल्हाधिका-यांनी घेणे. लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 संबंधी प्रशिक्षण देणे. अधिकारी महासंघांतर्गत अंतर्गत दुर्गा महिला मंच शाखा सर्व जिल्हयात स्थापन करणे. चक्राकार बदली, पददोन्नती, पदस्थापना पध्दतीतून महिलांना वगळणे.
अधिका-यांची संपूर्ण मोफत वैद्यकीय तपासणी करणे. महिला प्रसाधनगृहामधे सॅनीटरी नॅपकीनचे व्हेंडिंग व डिस्पोजल मशिन बसविणे. चांगल्या दर्जाचे व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करणे व शासकीय विश्रामगृहे प्राधान्याने उपलब्ध करणे
महिला पदाधिका-यांच्या राज्यव्यापी बैठकीत सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव विभागातून महिला अधिकारी उपस्थित होत्या. दुर्गा महिला मंचच्या राज्य अध्यक्षा डॉ. सोनाली कदम, अधिकारी महासंघ संस्थापक ग. दि. कुलथे, राज्य अध्यक्ष विनोद देसाई, राज्य सरचिटणीस समिर भाटकर, राज्य उपाध्यक्ष विनायक लहाडे, ज्ञानेश्वर जुन्नरकर, महिला पदाधिकारी वंदना गेवराईकर, सितल सेवतकर, सुवर्णा पवार, सुवर्णा जोशी, सविता नलावडे, सिध्दी संकपाळ, जयश्री गोरे, सरोज जगताप, कांचन जाधव, डॉ रेखा गायकवाड, विद्युत वरखेडकर, सुदाम टाव्हरे, दशरथ बोरकर आदींनी विचार मांडले
बैठकीच्या यशस्वीतेसाठी वृषाली पाटील, अशोक मोहिते, रवींद्र चव्हाण, विलास हांडे यांनी प्रयत्न केले. पुढील बैठक नागपूर येथे घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.