पुणे, : ग्रामपंचायत फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे येथील ग्रामपंचायत कार्यकारिणीमधील काही सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे यांचेकडे ग्रामपंचायतीमधील गैरकाभाराबाबत तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करुन मुबंई ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 अन्वये ग्रामपचांयत कार्यकारिणीवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान ग्रामपंचायत फुरसुंगीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या विकास कामे करण्यातआली, मोठ्या रकमा नियमबाह्य पध्दतीने खर्च करण्यात आल्याचे निदर्शनास आले. चौकशीअंती, कर्तव्ये पार पाडताना केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणी जबाबदार असल्याचे आढळून आल्याने संपूर्ण कार्यकारिणीवर मुबंई ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 अन्वये पदावरुन काढुन टाकण्याची कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायतीने विकास कामे करताना वित्तीय नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. नियमबाह्य पध्दतीने कामे केल्यास ग्रामपंचायतीवर कायदेशीर कार्यवाही होवू शकते याची दखल सर्व सदस्यांनी घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्तांच्यावतीने करण्यात आले आहे.