मुंबई, दि. 22 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून डॉ. मंजूला चेल्लूर यांनी आज शपथ घेतली.
राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी डॉ. मंजूला चेल्लूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी राज्यपालांच्या पत्नी विनोदा, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश विजया कापसे ताहिलरामाणी, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांचेसह मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, डॉ. चेल्लूर यांचे कुटुंबियांसह वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
शपथविधी समारंभानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह अनेकांनी मुख्य न्यायमूर्ती डॉ. चेल्लूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजूला चेल्लूर यांचा परिचय
- डॉ. चेल्लूर यांचा जन्म 5 डिसेंबर, 1955 रोजी बेल्लारी (कर्नाटक) येथे झाला.
- त्यांच्या आईचे नाव श्रीमती रंगाम्मा व वडिलांचे नाव सी. भीमाप्पा चेट्टी असे आहे.
- डॉ. चेल्लूर यांनी बेल्लारी येथील अल्लूम सुमंगलम्म महिला महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली असून सन 1977 मध्ये बंगलोर येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
- 11 ऑगस्ट 1978 रोजी त्यांनी वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. त्यावेळी त्या बेल्लारी कोर्टातील पहिल्या महिला वकील ठरल्या. त्यांनी बँक, कृषी प्रक्रिया आदी क्षेत्रात दिवाणी आणि फौजदारी कोर्टातील महत्वाच्या केसेस हाताळल्या आहेत.
- 15 एप्रिल 1988 रोजी त्या कर्नाटक कोर्टात जिल्हा न्यायाधीश म्हणून रुजू झाल्या.
- डॉ. चेल्लूर यांना इंग्लड मधील वारविक विद्यापीठाची फेलोशीप मिळाली आहे.
- 21 फेब्रुवारी 2000 रोजी त्यांची कर्नाटक हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली. कर्नाटक हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिला महिला न्यायाधीश ठरल्या.
- डॉ. चेल्लूर यांनी कर्नाटक विधी अकादमीचे अध्यक्ष म्हणून 21 फेब्रुवारी 2008 ते 25 मार्च 2010 या कालावधीत काम पाहिले आहे.
- कर्नाटक विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.
- 9 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची केरळ हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली. त्या 26 सप्टेंबर 2012 पर्यंत केरळ हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होत्या.
- 3 मार्च 2013 रोजी बिजापूर (कर्नाटक) येथील राज्य महिला विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.
- 5 ऑगस्ट 2014 पासून डॉ. चेल्लूर या कोलकात्ता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होत्या.
- 22 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.