पुणे
जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांची २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर सर्वप्रथम पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील भोर आणि इंदापूरमध्ये मतमोजणीच्या प्रत्येकी २४ फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर खडकवासल्यात २३ फेऱ्या आहेत. दौंड आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी २२ आणि बारामतीत सर्वांत कमी २१ फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि बारामतीचे निकाल हे सुरुवातीला जाहीर होऊ शकतात, असे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
मावळ आणि शिरूरमध्ये सर्वांत जास्त २९ फेऱ्या होणार आहेत. मावळमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघात, तर शिरूरमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात २९ फेऱ्या होणार आहेत. शिरूरमध्ये खेड-आळंदी, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २७, जुन्नरमध्ये २५ आणि आंबेगावात सर्वांत कमी मतमोजणीच्या २४ फेऱ्या होणार आहेत. मावळमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघात २४, मावळमध्ये २७ फेऱ्या होणार असून, अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या प्रत्येकी २५ फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. ‘ईटीपीबीएस’, टपाली मतदान आणि मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच याप्रमाणे ३० मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. ही मोजणी झाल्यानंतर अधिकृतपणे मतदारसंघांचा निकाल जाहीर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून, मतमोजणीच्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी पुणे आणि बारामतीसाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना १६ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– मोनिका सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
मॉडेल काउंटिंग स्टेशन
सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यासाठी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात मॉडेल काउंटिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण देण्याच्या नियोजनाची जबाबदारी पुणे जिल्ह्याकडे असून, १७ मे रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नगरमधील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सहभागी होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघ-विधानसभा मतदार संघ फेऱ्या
वडगाव शेरी -२२
शिवाजीनगर- २१
कोथरुड- २१
पर्वती -२२
पुणे कँटोन्मेंट- २०
कसबा -२१
बारामती लोकसभा मतदार संघ-विधानसभा मतदार संघ फेऱ्या
दौंड- २२
इंदापूर -२४
बारामती -२१
पुरंदर- २२
भोर- २४
खडकवासला -२३
शिरूर लोकसभा मतदारसंघ-विधानसभा मतदार संघ फेऱ्या
जुन्नर- २५
आंबेगाव- २४
खेड-आळंदी -२७
शिरुर -२७
भोसरी- २७
हडपसर- २९
मावळ लोकसभा मतदारसंघ-विधानसभा मतदार संघ फेऱ्या
पनवेल -२५
कर्जत- २५
उरण- २५
मावळ -२७
चिंचवड -२४
पिंपरी- २९
मावळ लोकसभा मतदारसंघ
मतदार संख्या : २२,९७,४०५
मतदान केलेले मतदार : १३,६५,८६१
मतदान केंद्रे : २५०४
शिरूर लोकसभा मतदारसंघ
मतदार संख्या : २१,७३,४२४
मतदान केलेले मतदार : १२,९०,५७५
मतदान केंद्रे : २२९६
पुणे लोकसभा मतदारसंघ :
एकूण मतदार : २०,७४,८६१
मतदान केलेले मतदार : १०,३४,१३०
मतदान केंद्र : १,९९७
बारामती मतदारसंघ
एकूण मतदार : २१,१२,४०८
मतदान केलेले मतदार : १२,९९,७९२
मतदान केंद्र : २,३७२