पुणे,दि.16 :- राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांना विविध साहित्य व वस्तू पुरविण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी बारामती येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या आयोजन व यशस्वीतेसाठी सर्व संबधित विभागांनी ताळमेळ ठेवून कार्य करावे अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत, या शिबीराच्या तयारीसंबधी केलेल्या कार्यवाहीचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. या शिबीरामध्ये ज्येष्ठ संवर्गातील दिव्यांग नागरिक सहभागी होणार असल्यामुळे लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करणे, साहित्य वितरणात सुसूत्रता ठेवणे, सर्व लाभार्थ्यांना साहित्य वितरीत करणे आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. शिबीरात सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला प्रांताधिकारी हेमंत निकम, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ए.व्ही.मोहोळकर, पोलीस निरिक्षक व्ही.डी.डबाडेल व सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.