पुणे :- वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेला वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज इन्फोसीस परिसरातील सभागृहात सुरुवात झाली.
परिषदेचे उद्घाटन वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजानवृक्षास जलार्पण करुन आणि दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख यु.के.अगरवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील, सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विकास खांडेकर उपस्थित होते.
मंत्रीमहोदयांनी यावेळी परिषदेत सहभागी झालेल्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंबधी चर्चा केली. 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रम, खाजगी वनांचा विकास, बाबू वनांचा विकास, बांबू लागवड व संवर्धन, इको टूरीझम व अन्य विषयांवर यावेळी अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत साधक बाधक चर्चा होते तसेच विचारमंथन होते, त्यामुळे वन विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात नवीन निर्णय घेणे शक्य होते असे सांगितले. वृक्ष लागवड उपक्रमाची दखल घेऊन लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जारी केलेले प्रमाणपत्र यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केले. वन विभागाच्या विविध योजना, जैवविविधता तसेच फुलपाखरांचे संगोपन इत्यादी विषयांवरील पुस्तकांचे विमोचन मंत्रीमहोदयांच्याहस्ते करण्यात आले.या परिषदेत सुमारे पन्नास ते पंचावन्न वरिष्ठ वन अधिकारी सहभागी झाले आहेत.