पुणे-घरातील खासगी गोष्टी फेसबुक वरील मित्र-मैत्रिणींशी शेअर करत असल्याच्या संशयातून पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 17 ते 18 जानेवारीच्या मध्यरात्री हडपसर येथील शिवसाई पार्क सोसायटीत घडली.
सोनाली राकेश गांगुर्डे (वय – 28), राकेश बाळासाहेब गांगुर्डे (वय – 34) दोघेही रा. शिवसाई अपार्टमेंट, फ्लॅट नं 104, सोलापूर रोड, हडपसर,पुणे) अशी या दुर्दैवी दाम्पत्यांची नावे आहेत.दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित होते. राकेश हा आयटी कंपनीत नोकरीस होता तर सोनाली संगणक अभियंता असूनही नोकरी करत नव्हती. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना मूल होत नव्हते. घरातील समस्या आणि घेत असलेल्या उपचाराविषयी व्हाट्सअप, फेसबुकद्वारे मित्र-मैत्रिणीला सांगत असल्याच्या कारणावरून हे सर्व करत असल्याचे राकेशने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे.
याप्रकरणी सोनालीचा भाऊ हर्षल महेंद्र पवार (रा.पाषाण) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीच्या आईने बुधवारी दिवसभर सोनाली हिला फोन लावला. मात्र, त्यांनी फोन उचलला नव्हता. त्यामुळे त्यांचा भाऊ हर्षल पवार हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गेले. खूप वेळ आवाज दिल्यानंतर काही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. पत्नीची हत्या करण्यापूर्वी राकेश गांगुर्डे यांने सुसाईड नोट लिहिली होती.
सहायक पोलीस निरीक्षक किरण लोंढे अधिक तपास करीत आहेत