पुणे – बांधकाम प्रकल्पावर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रेडाई पुणे मेट्रो आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विकसक आणि त्यांच्या अभियंत्यांसाठी दोन दिवसीय ‘सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्धाटन पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि अतिरिक्त कामगार आयुक्त रतनदिप हेंद्रे यांच्या हस्ते झाले. सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी साईट सेफ्टी मॅन्युअल आणि रिअल ईस्टेट डेव्हलपर्स मॅन्युअलही काढण्यात आले आहे. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, सुरक्षा समितीचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, क्रेडाई कुशलचे अध्यक्ष जे.पी.श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल फरांदे उपस्थित होते.
कार्यक्रमाविषयी बोलताना वाघमारे म्हणाले की, सुरक्षेच्या बाबतीत विकसक आणि अभियंताना प्रशिक्षण देण्याचा क्रेडाई पुणे मेट्रोचा हा स्तुत्य उपक्रम आहे. क्रेडाई नेहमीच व्यावसायिकदृष्य्या विचार न करता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करत असते. क्रेडाई कडून नेहमीच आम्हाला सहकार्य लाभले आहे स्वच्छ भारत उपक्रमासाठीही क्रेडाई ने आम्हाला मदत करावी. असे आव्हान ही त्यांनी यावेळी केले.
हेंद्रे म्हणाले की, बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी असणे आवश्यक आहे. कामगारांची नोंदणी झाली नसेल तर अपघात झाल्यास त्याला सरकारी कुठलीही मदत मिळत नाही. तसेच कामगार कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विकसकांनी या कायद्याचे पालन केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या कामगारालाही या कायद्याचे सर्व फायदे मिळू शकतील. आपण सगळ्या गोष्टींची भरपाई करू शकतो परंतु कामगारांचा जीव गेल्यास त्याची भरपाई कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची सध्या गरज आहे. विकसकांना प्रोत्साहन देण्यासाठी झीरो अक्सिडेंट साईट पुस्काराची कल्पनाही त्यांनी यावेळी मांडली.
क्रेडाई ही एकमेव संस्था आहे जी बिल्डर्स आणि अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याच काम करत आहे. आम्ही काढलेले दोन सुरक्षा मॅन्युअल नक्कीच लोकांच्या उपयोगी पडतील. कारण अपघात झाला की त्याची जबाबदारी कोणी स्विकारत नाही प्रत्येक जण दुसऱ्याला दोष देत असतो. अपघातांचे प्रमाण शुन्य टक्क्यावर यावे, अपघात झाल्यास त्यासंबंधीची उपाययोजना कशी करावी यासाठी आम्ही हे प्रशिक्षण चालू केले आहे, असे मत काटारिया यांनी व्यक्त केले.
हेंद्रे यांनी मांडलेल्या झीरो अक्सिडेंट साईट पुस्कार या संकल्पनेवर कटारिया यांनी फरांदे स्पेसेस प्रायोजित, ‘क्रेडाई पुणे मेट्रो फरांदे स्पेसेस’ पुरस्काराची घोषणा केली. दरवर्षी शुन्य अपघात असलेल्या बांधकाम साईटला हा पुस्कार देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रशिक्षणामध्ये बांधकाम सुरक्षितता, कायदेशीर पार्श्वभूमी, बांधकाम प्रकल्पावरील अपघात, अपघाता नंतर करावयाच्या उपाययोजना यांसारख्या विषयांवर मुख्य अभियंता के.के.मेहता, सुरक्षा तज्ज्ञ ऐ.के. कुलकर्णी हे मार्गदर्शन करतील.