पुणे : इदगाह मैदानातील प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून देवू तसेच लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. इदगाह मैदानात आज पालकमंत्री गिरीश बापट तसेच सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, अभियंते सोपान गायकवाड, मौलाना निजामुद्दीन,नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर,रुपाली बिडकर, मनिषा लडकत, जैनुल काजी, इसाकभाई चाविवाले, ताहेर आसी अहमद शेख, रफिक शेख, युसुफ बागवान, तनवीर सय्यद, शैलेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
इदगाह मैदानात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाण्याची टाकी बांधावी, तसेच या मैदानाची पडलेली भिंत बांधून मिळावी, या मैदानात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात यावे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. ही प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्याची ग्वाही श्री बापट यांनी दिली. यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. यावेळी मंत्री दिलीप कांबळे यांनीही समाजकल्याण मंत्रालयाकडून निधी देण्याचे मान्य केले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही प्रत्येक व्यक्ती आणि समूहाची सार्वजनिक जबाबदारी आहे. त्यामुळे इदगाह मैदानात करण्यात येणारे वृक्षारोपण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. भविष्यात या झाडांचे संगोपन आणि संवर्धन ही निश्चितच होईल याची मला खात्री आहे. असही ते यावेळी म्हणाले.