प्रदूषण नियंत्रण संशोधनाबद्दल अमोल चाफेकर यांना शिष्यवृत्ती
लंडनच्या प्रसिद्ध संस्थेकडून सन्मानित
पुणे – लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग या संस्थेकडून अमोल चाफेकर यांना त्यांच्या प्रदूषण नियंत्रणा संबंधित उल्लेखनीय संशोधनाबद्दल ‘इनोव्हेशन इन पोल्युशन कंट्रोल’ ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यात ६ महिन्यांसाठी प्रशिक्षण असून २ आठवड्यांचे ऑनसाइट प्रशिक्षण असणार आहे.
न्यूटन फंड प्रोग्रामच्या अंतर्गत काही मोजकेच संशोधक या शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. भारतातून १५ संशोधक निवडले गेले त्यातले पुण्याचे अमोल चाफेकर एक आहेत. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधकांमध्ये उद्योजक क्षमता आणि व्यावसायिकीकरणाच्या कौशल्यांची निर्मिती करण्याचा हेतू होता.
निवड प्रक्रिया अतिशय कठीण होती. त्यांच्या संशोधनाचे कौशल्य, त्यांच्या नवकल्पनाची क्षमता, त्यांच्या संशोधनाचे सामाजिक आणि आर्थिक फायदे या आधारांवर त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली .
ही शिष्यवृत्ती फिलीपीन्स, केनिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पेरू, मेक्सिको, कोलंबिया, ब्राझिल, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, चिली, चीन, इजिप्त, तुर्की येथील वैज्ञानिक आणि संशोधकांही देण्यात आली आहे.