मुंबई : दुधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येते. याचाच भाग म्हणून मुंबई मध्ये काल अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत मुंबईत दूध पुरवठादारांकडून होणाऱ्या दुधाची तपासणी करुन भेसळयुक्त दुध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करण्यात आली. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
मुंबई मध्ये रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या पाच ठिकाणी यात मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका, मुंलुंड पूर्व नाका ही मोहिम राबवली गेली. या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे ६० ते ७० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाचही ठिकाणी एकाच वेळी तपासणी मोहिम सुरु होती. या तपासणीमध्ये २२७ वाहनांतील ९,२२,९२८ लिटर दुध तपासण्यात आले या प्राथमिक तपासणीत दुधाचे पाच ब्रँडचे नमुने कमी प्रतीच्या दर्जाचे आढळले त्यामुळे ३,४४,००० लिटर दुध सील केले तसेच दुधाच्या आठ टँकरमध्ये भेसळयुक्त दुध आढळून आले या भेसळीमध्ये अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले.
त्यामुळे हे १९२५० लिटर दुध नष्ट करण्यात आले व हे दुध ज्या जिल्हयातून आले होते. त्या जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांवर यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. दुधाला पूर्ण अन्न म्हणून मान्यता आहे. आजही प्रत्येक घरात लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत दूध घेतले जाते. या दूधापासून खवा, दही, पनीर, चीज, आईसक्रीम व विविध प्रकारच्या मिठाई तयार होतात. मात्र दुधाची वाढती मागणी लक्षात घेता भेसळखोरांकडून यात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावर बंधन आणण्यासाठी शासन कठोरात कठोर कारवाई करणार आहे अशी माहिती बापट यांनी दिली.