पुणे-ईव्हिएम मशीनचा घोळ अनेक निवडणुकांमध्ये होत असल्याचा आरोप करीत आता निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन उद्या (19 मे) ससून हॉस्पिटलजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, चेतन तुपे उपस्थित होते.
लोकशाहीत निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. यासंदर्भात व्हीव्हीपॅट लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सरकारला देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा निर्देश देऊन स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मात्र अजूनपर्यंत कोणताही खुलासा केलेला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकसह अनेक निवडणुकांमध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत आढळली आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशीनचा फेरविचार व्हायला हवा. अनेक मोठ्या देशांमध्येही बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. त्याधर्तीवर आता या सर्व निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर व्हाव्यात या मागणीसाठीच हे आंदोलन असल्याचे बागवे यांनी सांगितले.