मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खासदार काकडेंच्या घरच्या गणपतीची आरती
पुणे, दि. 6 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. अत्यंत व्यस्त असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या घरी भेट दिली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खासदार काकडे यांच्या घरच्या गणपतीची आरती झाली.
महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी देखील अतिशय वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांनी खासदार संजय काकडे यांच्या घरी जाऊन गणपतीच्या केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार संजय काकडे, त्यांच्या पत्नी उषा, मुलगा विक्रम, मुलगी कोमल व सून देविका असे सहकुटुंबाने स्वागत केले.
खासदार काकडे यांच्या घरी आरतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसाद घेतला आणि गौरी-गणपतीसाठी केलेल्या सजावटीचे विशेष कौतुक केले. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती.
पुण्यात गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व असून एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या व महत्वाच्या गणपतींचे दर्शन घेतले.