पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्रथम वर्ष समाजकार्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मुळशी तालुक्यातील लवार्डे या गावी नुकत्याच पार पडलेल्या विशेष राष्ट्रीय सेवा योजना शिबिरादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करीत पी आर ए व सर्वेक्षणाच्या आधारे गावचा कृती आराखडा व विकास आराखडा बनविण्याची किमया करून दाखविली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रयत्न व मार्गदर्शनामुळे गावच्या इतिहासामध्ये प्रथमच आदिवासी महिलांनी ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊन त्यांच्या समस्यांबद्दल मते नोंदविण्याचे धाडस दाखविले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्वे समाज सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लवासा रस्त्यावरील लवार्डे गावी राष्ट्रीय सेवा योजने च्या विशेष ७ दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. महेश ठाकूर व प्रा. चेतन दिवाण यांनी केले होते त्यादरम्यान समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी ही किमया करून गावकर्यांची वाहवा मिळविली आहे.
शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबीर कालावधीमध्ये मशाल फेरी, प्रभात फेरी, शिवार फेरी, मूल्य साखळी, गाव सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, महिला , तरुण, शेतकरी व विद्यार्थी बैठका, सर्वेक्षण आणि पी. आर. ए. आदी व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करीत संपूर्ण गावच्या समस्यांचा व उपलब्ध संसाधनांचा सखोल अभ्यास व आढावा घेऊन शिबिराच्या सांगता समारोप समारंभावेळी आयोजित ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यासमोर गावचा कृती आराखडा व विकास आराखडा सादर केला.ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरभरून दाद दिली व ग्रामसभेमध्ये सक्रीय सहभाग नांदवून विद्यार्थ्यांनी बनविलेला गाव विकास आराखडा जाणून घेतला.
कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक दीपक वलोकर, जि. प. सदस्य सागर काटकर, जि. प. सदस्य अंजलीताई कांबळे, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे आदी मान्यवरांनी शिबिरार्थी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या तसेच शिबीर समारोपावेळी आयोजित ग्रामसभेस सरपंच सौ. अस्मिता मारणे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, ग्रामसेवक श्री अडसूळ, माजी सरपंच सौ सुतार, माजी उपसरपंच अशोक चौले, प्रगतशील शेतकरी दगडू मारणे, व विलास मारणे, माजी सरपंच नामदेव चौले व वसंत काटकर तसेच बहुतांशी ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा गौरव केला.
प्रा. डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, रुपेश पवार, श्याम खोंड यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शिबिर व शिबीर उपक्रमांसंबंधी प्रशिक्षण व पी. आर. ए. तसेच सर्वेक्षणासाठी व्यावसायिक मार्गदर्शन केले.