लोकसभेची तयारी सुरु :खा .संजय काकडे
पुणे- पुण्याच्या राजकारणात बराच अवधी साधलेली ‘चुप्पी’ राज्यसभेचे सदस्य असलेले,भाजपचे सहयोगी खा. संजय काकडे यांनी आज जाहीरपणे तोडल्याने आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपात पुन्हा एकदा ‘काकडे स्फोट ‘ होत असल्याचे दिसून येते आहे . आपणास भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल आणि लोकसभेला आपण इच्छुक असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आपण निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत असे आज खा. संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केले. आपण साडेतीन लाखाच्या मताधिक्याने लोकसभा जिंकू असा दावा करत आणि पक्ष देईल तो आदेश पाळू , अनिल शिरोळेना उमेदवारी दिली तर त्यांचे काम मनापासून करू,गिरीश बापटांना उमेदवारी दिली तर पक्ष म्हणून काम करू अशी त्यांनी पुष्टी जोडल्याने …त्यांची इच्छुक उमेदवारी हे गिरीश बापटांना शह देण्याचे राजकारण आणि शिरोळे यांना पाठींबा देणारी कृती आहे कि २०२० नंतर पुन्हा एकदा राज्यसभा निश्चिती करून घेण्याचे राजकारण आहे यावर खल होणार आहे .
दरम्यान या सर्व प्रश्नांचा काकडे यांनी इन्कार केला , आपणास स्वतःला आता जनतेतून निवडून जावयाचे आहे . आणि आपण तशी खास तयारी केली आहे.आणि आपल्या तयारीचा सर्वकष फायदा हा पक्षालाच होणार आहे . आपण राष्ट्रवादीत जाणार नाही, तशी ऑफर आपल्याला नाहीच ,आणि येणार हि नाही हे स्पष्ट करत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही .. अशी स्थिती आहे याकडे लक्ष वेधून आपण भाजपकडून च लढू आणि पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले .यदाकदाचित तुम्ही ..नाहीच दिली पक्षाने उमेदवारी तर काय ? हा प्रश्न विचारताय म्हणून .. आपण पक्षाचे काम करू … असे ते म्हणाले .
एकंदरीत गिरीश बापट यांना काकडे यांचा विरोध असल्याचा राजकीय समीक्षकांचा दावा आहे आणि म्हणूनच ते निवडणुकीच्या रणांगणात एवढ्या अगोदरच शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत . असेही सांगण्यात येते .या पार्श्वभूमीवर आता लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये ‘काकडे स्फोट ‘ कोणकोणते रंग उधळणार आहे, आणि त्यांचा भाजपातील बापट समर्थक कसा सामना करणार आहे ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल असे दिसते आहे .