पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील आमदारांनी नागपूर मेट्रोला भेट देऊन मेट्रोच्या कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर या कामाबद्दल पालकमंत्री व आमदारांनी समाधान व्यक्त केले. ‘नागपुर मेट्रोचे’ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी या शिष्टमंडळाला माहिती दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे असलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. पुणे मेट्रोचे काम नागपुर मेट्रोला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्वपूर्ण आहे.
“केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरी नंतर पुणे मेट्रोच्या कामाला गती प्राप्त होईल. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानंतर यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. वित्त पुरवठा करणार्या कंपन्यांकडूनही आवश्यकतेनुसार लवकरात लवकर निधी मिळेल यासाठी प्रयत्न करू” असे आश्वासन मंत्री बापट यांनी दिले. केंद्राच्या अधिसूचनेनंतर भूसंपादन करण्यास कायदेशीर अडचणी येणार नाहीत. पर्यावरणा संदर्भातील अडचणीही लवकरच दूर होतील. नागपुर मेट्रोप्रमाणेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे मेट्रोचे काम लवकर पूर्ण होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरी नंतर या महिना अखेर पासून पुणे मेट्रोसाठी सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी माहिती ‘नागपुर मेट्रोचे’ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी दिली. केंद्र सरकारने ‘पुणे मेट्रो’ साठी अधिसूचना काढल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. प्रकल्पासाठी भूसंपादन करणे ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. भूसंपादन करताना रस्त्याखाली मध्यभागी असणार्या जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या वीज, टेलिफोन आणि इंटरनेटच्या वाहिन्या हलवाव्या लागणार आहेत. त्यासाठी सर्व्हे करणे गरजेचे असून या महिन्याच्या अखेर पर्यन्त ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. यानंतर टप्याट्प्याने इतर कमांच्या निविदा काढून येत्या तीन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरू होईल असे ते म्हणाले.
या वेळी नागपूर मेट्रो चे प्रकल्प संचालक महेश कुमार, वित्तसंचालक सिवामाथन, अपर महाप्रबंधक(वित्त-प्रशासन)अनिल कोकाटे, उपमहाप्रबंधक( जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे यांसह अधिकारी उपस्थित होते.