निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न- गिरीश बापट
पुणे– उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे मुंढवा घोरपडी येथील प्रभाग क्रमांक 21मधील रिक्त झालेल्या जागेसाठी भाजप अणि रिपाई युती कडून नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली हिला उमेदवारी देण्यात आली असून याबाबतची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे उपस्थित होते. या जागेसाठी ११ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
नवनाथ कांबळे हे प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले होते. त्यांच्या जागी आता त्यांची कन्या हिमाली यांना भाजप अणि रिपाई युती कडून नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाली या सध्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असून निवडणुकीसाठी आवश्यक असलेले वय त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणी म्हणून त्यांना संधी द्यावी, असे कार्यकर्त्यांनी नेत्यांना सुचविले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे महेंद्र कांबळे यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध करावी, असाही प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे बापट यांनी सांगितले
पुणे महापालिकेसह बृहन्मुंबई, नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल.