पुणे : : महानगरपालिकेचा कारभारी बदला, पुण बदलेल अशा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या सूचक आवाहनाला पुणेकरांनी आपल्या मतपेटीतून सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे या अभूतपूर्व यशाचा सोहळा साजरा करण्यासाठी विजयी उमेदवारांनी भाजप कार्यालयाबाहेर अक्षरशः रीघ लावली. गुलालाची उधळण करत तसेच पुष्पगुच्छ, पेढे वाटून त्यांनी आपला आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला. “पुण्याची ताकद गिरीश बापट” अशा एकाच घोषणेने भाजप कार्यालय फुलून गेले. कोणी पक्षाचे झेंडे फडकवत होते तर कोणी भाजपचे प्रचार गीत वाजवून जल्लोष करत होते. उमेदवार आणि कार्यकर्त्यांची झुंबड दुपारपासूनच लोटल्याने पक्ष कार्यालय दुमदुमून गेले.
यावेळी विविध प्रभागातील विजयी उमेदवारांनी पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची भेट घेतली. नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बापट यांनी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच त्याच्यावर आता जबाबदारी वाढली असल्याची जाणीव त्यांना करून दिली. आपला आनंद साजरा करताना इतरांना त्रास होऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावणे, फटाके वाजवणे असे वर्तन करू नये असे आवाहन त्यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना केले. पुणेकरांनी आपल्याला दिलेल्या संधीचे आपण सोने करायचे आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच आपले ध्येय असायला हवे त्यादृष्टीने आपण कार्य करावे असे मार्गदर्शन बापट यांनी भावी नगरसेवकांना केले. यावेळी पोलिसाचाही चोख बंदोबस्त तैनात होता.