वेल्थ प्लॅनेट (यु.के.) कडून मराठी रसिकांसाठी दुहेरी मनोरंजनाची मोफत पर्वणी..!
१४ डिसेंबर रोजी बालगंधर्व येथे रात्री प्रयोग..!
पुणे – मानाच्या पुरूषोत्तम एकांकिका करंडकासह विविध एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या आणि रोटरी क्लब करंडक विजेती ‘भूमिका’ या एकांकिकेचे आता रंगमंचावर व्यावसायिक प्रयोग सादर होणार आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या उत्तरार्धात मान्यवर दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक, अभिनेते यांची प्रकट मुलाखत, स.प.महाविद्यालयाचे विद्यार्थी घेणार आहेत.या आगळ्या वेगळ्या उपक्रमांतर्गत ‘भूमिका’चे प्रयोग रसिकांना विनाशुल्क पहाण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि या उपक्रमाचे सादरकर्ते प्रणित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘भूमिका’ नाटकाची कार्यकारी निर्मिती संस्था ‘फोर्थ वॉल एंटरटेनमेंट’ असून ‘वेल्थ प्लॅनेट’ने या प्रयोगांना विशेष आर्थिक सहकार्य देऊन व्यावसायिक रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. या बद्दल अधिक माहिती देताना प्रणित कुलकर्णी म्हणाले, स. प. महाविद्यालय, पुणे कला मंडळातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग असलेल्या या एकांकिकेने अनेक स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या ‘भूमिका’ कथेवर आधारीत या एकांकीकेचे लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय पटवर्धन, गौरव बर्वे यांनी केले आहे. या विशेष उपक्रमाचा पहिला पयोग १४ डिसेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९.३० वा. पार पडणार आहे.
या प्रसंगी नाटकाच्या उत्तरार्धात नुकत्याच गाजलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांची मुलाखत होणार आहे.
मराठी रंगभूमीवरील अभिनेत्याच्या जीवनातील प्रत्यक्ष घालमेल,मानसिक स्थित्यंतरे या नाटकात रोमहर्षक पध्दतीने मांडण्यात आली आहेत. नाटकाचे नेपथ्य मुग्धा भालेराव, प्रकाश योजना शर्व सरज्योतिषी, पार्श्वसंगीत अमोघ इनामदार यांचे आहे. गौरव बर्वे, चिन्मय पटवर्धन, नाथ पुरंदरे, अभिषेक रानडे, शार्दूल गानू, आदित्य बीडकर आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.
मराठी भाषेतील उत्कृष्ठ कलाकृती आणि प्रतिभावंत कलाकारांना सादर करणारा हा ‘भूमिका-उपक्रमाचा’ शुभारंभाचा प्रयोग व इतर पुणे-मुंबईतील प्रयोग रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य होणार आहेत अशी माहिती वेल्थ-प्लॅनेट (यु.के.) चे सी.ई.ओ. आणि गुंतवणूक सल्लागार अभिजीत कुलकर्णी यांनी दिली.