दीड हजार विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचा फलक निघाला ऑलिम्पिक विजेत्या घरांकडे
आझम स्पोर्टस् ऍकॅडमीचा उपक्रम
पुणे :
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आझम स्पोर्ट्स ऍकॅडमीच्या उदयोन्मुख खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधू यांचे अभिनंदन करणारा फलक तयार केला आहे. या फलकावर आझम स्पोर्ट्स ऍकॅडमीमधील दीड हजार खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत. पदक विजेत्या साक्षी आणि सिंधू यांच्या विजयाचा आम्हाला गर्व आहे, असा आशय असलेला हा फलक साक्षी मलिक यंाच्या निवासस्थानी हरियाणा येथे तर पी.व्ही.सिंधू यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानी पाठविण्यात येणार आहे. या फलकावर एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार आणि सचिव लतिफ मगदूम यांच्यादेखील स्वाक्षऱ्या आहेत.
शुक्रवारी आझम स्पोर्ट्स ऍकॅडमीच्या वतीने “रिओ ऑलिम्पिक’ मधील विजयाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. साक्षी मलिक हिने 58 किलो वजनी गटात भारताला पहिले ब्रॉन्झ पदक मिळवून दिल्याबद्दल आणि पी.व्ही.सिंधू हीने बॅडमिंटन खेळात मिळविलेल्या रजतपदकाबद्दल “आझम स्पोर्टस ऍकॅडमी’तील विद्यार्थी व खेळाडूंनी हा आनंदोत्सव केला. विद्यार्थी व खेळाडूंनी हातात तिरंगी ध्वज आणि पदक विजेत्या खेळाडूंचे छायाचित्र घेऊन तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद साजरा केला.
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या “रिओ ऑलिम्पिक’मधील अंतिम फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण एम.सी.ई. सोसायटीच्या असेम्ब्ली हॉलमध्ये विद्यार्थी, खेळाडू आणि संस्थेचे मान्यवरांनी पाहिले. अशी माहिती “आझम स्पोर्ट्स ऍकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी दिली.
पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “आझम स्पोर्ट्स ऍकॅडमी’मध्ये बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, ऍथलॅटिक्स, सॉफ्टबॉल, बास्केटबॉल, हॉकी इ. खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. अनिसा सय्यद (2012, कॉमनवेल्थ विजेती), दिक्षा पिल्ले (सॉफ्टबॉल, आशिया चॅम्पियन 2013), प्रिया आगरवाल (पिस्तुल शुटींग) असे अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय खेळाडू “आझम स्पोर्ट्स ऍकॅडमी’मधून प्रशिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत.
आनंदोत्सवप्रसंगी एम.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, मुनव्वर पीरभॉय (हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट), “आझम स्पोर्ट्स ऍकॅडमीचे संचालक गुलजार शेख, “आझम स्पोर्ट्स ऍकॅडमी’चे खेळाडू आणि विद्यार्थी उपस्थित होते.