सोलापूर: जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर केले आहे.या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला व जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. गेल्या 6 वर्षात सोलापूरमधील जवळपास 250 प्रोफेशनल गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. गेल्या 3 वर्षात तब्बल 12 लोकांनी आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेले 1 वर्ष सराव करून अनुराधा काजळे यांनी ही मोहीम यशस्वी केली. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता किलीमांजारो शिखराच्या गिलमन्स पॉइंट याठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेने स्थापन केलेल्या 360एक्सप्लोरर मार्फत साहसी खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळ्या जागतिक मोहीम आखल्या जात आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या खंडातील गिर्यारोहण, स्काय डायविंग, स्कुबा डायविंग हे सर्व समाविष्ट आहे.
२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथून निघून आफ्रिकेतील टांझानिया या देशातील किलीमांजारो हे शिखर सर करून ४ डिसेंबर रोजी अनुराधा काजळे या सोलापूरमध्ये दाखल झाल्या. 360 एक्सप्लोरर टीम मार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी 360 एक्सप्लोरर चे आनंद बनसोडे, अक्षया बनसोडे, रोहित शेंडे, सागर जानराव, कलशेट्टी सर, उमेश डूमने, कैलास जानराव उपस्थित होते.
-360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लबचे यश–
सोलापूर मधील सर्वच शिक्षकाना ट्रेकिंग ची आवड निर्माण व्हावी तसेच त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख निर्माण व्हावी म्हणून आनंद बनसोडे व इतर गिर्यारोहकांनी “360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लब” सोलापूरमध्ये सुरू केले आहे. त्याची अध्यक्ष म्हणून अनुराधा काजळे यांची नुकतीच निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी मिळवलेले हे पहिलेच यश आहे. ज्यांना या ट्रेकिंग क्लब मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९०६७०४५५००/ ९०६७०३५५०० वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
–अनुराधा काजळे यांची माहिती-
अनुराधा काजळे या सोलापूर जिल्हा परिषद विडी घरकुल शाळेतील शिक्षिका आहेत. त्या कवयित्री असून त्यांचे ‘मनीचे गुज’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी यापूर्वी स्वर्गारोहिणी व कळसुबाई यासह विविध शिखर सर केले आहेत. त्यांचा स्वकुळरत्न यासह विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
– आनंद बनसोडे –
“सोलापूरमधील प्रथम शिक्षिका व महिला गिर्यारोहक म्हणून अनुराधा काजळे यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. किलीमांजारो सर करून जिल्हापरिषद शिक्षकांपुढे एक आदर्श निर्माण केला. 360 एक्सप्लोरर मार्फत अनेकांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यांना गिर्यारोहणामध्ये काहीतरी भव्य-दिव्य करायचे आहे त्यांनी नक्कीच मला संपर्क करावा.”
-अनुराधा काजळे-
“हे यश माझ्या कुटुंब व मित्रपरिवाराला समर्पित आहे. पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास तेही आफ्रिकेत असल्यामुळे खूप भीती वाटत होती परंतु एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी मुंबई विमानतळापासूनच अतिशय योग्य असे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या जोरावरच मी हे यश मिळवू शकले. अतिशय त्रास होत असताना अंतिम चढाई पूर्ण करू शकले याचा मला खूप आनंद आहे.”