पुणे: नृत्यभारती कथक डान्स अकॅडमी, पुणेच्या वतीने, गुरू पं रोहिणी भाटे यांच्या ‘लहजा’ या हिंदी भाषेतील पुस्तकाचे येत्या रविवारी( ता.१९) प्रकाशन होणार आहे.शकुंतला शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, कर्वे नगर येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेल.
नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीची ७१ वर्षपूर्ती तसेच कथक सम्राज्ञी पं रोहिणी भाटे यांची १० वी पुण्यतिथी असे दुहेरी औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मूळ मराठी पुस्तक ‘लहजा ‘ यातील गुरु रोहिणीताईंच्या शोधनिबंधाच्या हिंदी रूपांतराबरोबरच त्यांचे मूळ हिंदीतूनच लिहिलेले शोधनिबंध व कथक नृत्यासाठी लिहिलेले हिंदी कविता यांचा समावेश आहे. तसेच काही मान्यवरांचे गुरु रोहिणी भाटे यांच्यावरील लेखही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. भाषांतराचे काम स्मिता दाते, नीलिमा अध्ये, सुनीता पुरोहित यांनी केले आहे. दिल्ली येथील रझा फाऊंडेशन व राजकमल प्रकाशन यांच्याकडून रझा पुस्तक माला: कला या अंतर्गत हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
रझा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक वाजपेयी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी प्रसिद्ध नर्तक व लेखक पुरु दधीच आणि प्रसिद्ध नर्तक जयंत कस्तुआर हे पुस्तकाची समीक्षा करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.