गायन नृत्यविष्काराची ‘संवेदन’ मैफल
प्रकृति नृत्यालयातर्फे येत्या शनिवारी आयोजन
पुणे: गुरू रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व प्रकृति नृत्यालयाच्या संस्थापिका नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘संवेदन’ मैफलीचे येत्या शनिवारी (दि.२५) आयोजन करण्यात आले आहे. गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी होणारी संवेदन मैफल यंदा शकुंतला शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल, कर्वेनगर येथे सायंकाळी ५ ते ९ या वेळेत पार पडणार आहे.
आपल्या मनमोहक नृत्यशैलीतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लखनौ घराण्याचे सुप्रसिद्ध कथक नर्तक पं राम मोहन महाराज यांचे नृत्य सादरीकरण संवेदन मैफलीच्या पूर्वार्धात होणार आहे. ते नृत्याप्रमाणेच गायन, वादन कलेतही निष्णात असल्याने एक हरहुन्नरी कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. तर किराणा घराण्याच्या गायकीला आपल्या ख्याल शैलीतून सादर करणारे प्रतिभावंत गायक पद्मभूषण छन्नूलाल मिश्र यांची सुरेल गायकी अनुभविण्याची संधी देखील याच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना लाभणार आहे. ठुमरीसम्राट अशी देखील छन्नूलाल मिश्र यांची वेगळी ओळख असून त्यांच्या स्वरांनी संवेदन मैफलीची स्वरमय सांगता होणार आहे. ‘लखनौ का अंग और ठुमरी के रंग’ एकत्रित उलगडणारी संवेदन मैफल रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अभिजात कथक कलेचे विलक्षण वरदान लाभलेल्या गुरू रोहिणीताई भाटे यांच्या नृत्यसाधनेला संगीत कलेचीही अनोखी जोड होती. त्यांनी संगीतबध्द केलेल्या असंख्य अजरामर रचना आजही अनेक रंगमंच गाजवीत आहेत. गुरू रोहिणीताईंच्या या दुहेरी कलेला सांगीतिक आदरांजली वाहणे हाच ‘संवेदन’ मैफलीचा मुख्य उद्देश आहे. त्यांची नृत्यसंपदा व कलेचा विचार सर्वदूर पोहोचविणे हे प्रकृति कथक नृत्यालयाचे ध्येय आहे. यासाठी गेली २२ वर्षे कथक क्षेत्रात निष्ठेने कार्य करत असल्याचे संस्थेच्या संस्थापिका नीलिमा अध्ये यांनी नमूद केले आहे.