डॉ. करंदीकर यांचे ज्ञानेश्वरी आणि ओंकार साधने वरील संशोधन मौलिक – भारत सासणे
स्व. डॉ. जयंत करंदीकर लिखित ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे– विश्वाचा श्वास म्हणजे ओंकार आहे, पिडीतांना जगण्याची उमेद म्हणजे ओंकार आहे, ईश्वराच्या आधी आणि नंतर सुद्धा ओंकार असून विजयाचा मंत्र म्हणजे ओंकार होय असे सांगणाऱ्या डॉ. जयंत करंदीकर यांचे ज्ञानेश्वरी आणि ओंकार साधने वरील संशोधन अत्यंत मौलिक आहे, यामुळे ते जगभरात जाणे महत्वाचे आहे, यासाठी त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद व्हावा असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
ओम शक्ती केंद्र नगरचे संस्थापक स्व. डॉ. जयंत करंदीकर लिखित ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि डॉ. करंदीकर यांनी संगीत दिलेल्या ‘गीत आसावले तुझ्यासाठी’ या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सासणे बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, ओम शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त डॉ. किशोर भिंगारे, वैशाली भागवत, बाबासाहेब सौदागर, डॉ. गिता करंदीकर, डॉ. नीरज करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सासणे म्हणाले, ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ पुस्तकात डॉ. करंदीकर यांनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत महत्वाची आहेत, वाचा आणि मन व शरीरावर होणारा ओंकाराचा परिणाम यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे यामुळे करंदीकर यांचे संशोधन कल्याणकारी आहे, यामुळे हे ज्ञान जगभर पोहचणे आवश्यक आहे.
अनुराधा मराठे म्हणाल्या, मेहेराबाबाच्या एका कार्यक्रमात आमची पहिली भेट झाली होती, त्यांच्या उपचार पद्धती विषयी मी ऐकले आणि एक दिवसाचे शिबीर केले होते. दरम्यान माझा आवाज आठ महिने बंद झाला होता, डॉ. करंदीकर यांच्या ओंकार स्वर साधनेचा फायदा झाला, रवींद्र साठे आणि अन्य गायक, कलावंतानाही या प्रणालीचा उपयोग झाला आहे. वाचाशुद्धी हे कार्य ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत हे मी अनुभवले आहे. त्यांचे मार्गदर्शन अनेक गायकांना महत्वपूर्ण ठरले आहे.
कुवळेकर म्हणाले, १२ वर्षापूर्वी ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते, दुसरी आवृत्ती येत असताना त्याचा कर्ता नाही याचे दुःख वाटते. डॉ. करंदीकर यांची ओंकार साधना आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास गाढ होता. त्यांनी विश्वकल्याणाचा विचार करून आपले कार्य सुरु केले. वाचा, मन आणि शरीर शुद्धीसाठी त्यांनी केलेले अनमोल आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘गीत आसावले तुझ्यासाठी’ हा गाण्यांचा कार्यक्रम झाला, यामध्ये नीरज करंदीकर, रोहित पारखे, डॉ. सत्तार सय्यद यांचे गायन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती करंदीकर यांनी केले.