‘व्होडाफोन रंगसंगीत 2017’च्या आठव्या आवृत्तीचे विजेते जाहीर
पुणे – बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या ‘व्होडाफोन रंगसंगीत 2017’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणेच्या रंगपंढरीने सादर केलेले ‘फडस’ हे नाटक संगीत नाटक विभागात विजयी ठरले, तर रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजने सादर केलेली ‘मॅडम’ ही एकांकिका गद्य एकांकिका विभागात विजेती ठरली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. ख्यातनाम अभिनेते सुबोध भावे, उमेश कामत आणि जितेंद्र जोशी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.
संगीत नाटक विभागातील विजेत्यांना करंडक आणि एक लाख रुपयांचे, तर गद्य एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांना दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि करंडक प्रदान करण्यात आला. याशिवाय एकूण पाच लाख रुपयांची इतर पारितोषिकेही देण्यात आली.
सहभागी कलाकारांनी केलेल्या उत्तमोत्तम सादरीकरणांतून विजेत्या कलाकारांची निवड करणे, हे तज्ज्ञ परीक्षकांसाठी आव्हान ठरले. मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिकांशी संबंधित कलाकार श्रीरंग गोडबोले, किरण यज्ञोपवीत आणि विभावरी कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
व्होडाफोन इंडियाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसायप्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, ‘एक मूल्याधारित संस्था म्हणून व्होडाफोन समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देणे आपले कर्तव्य मानते. व्होडाफोन रंगसंगीत स्पर्धेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. गांभीर्याने घ्यायची कला म्हणून मराठी नाटकावर पुन्हा एकदा झोत टाकण्याच्या उद्देशाने व्होडाफोन रंगसंगीतची संकल्पना मांडण्यात आली. तरुणांनी या कलेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणूनही पाहावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचाही हा प्रयत्न आहे. यंदा महाराष्ट्र आणि गोव्यातील सहा केंद्रांवर 100 हून अधिक संघ स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेतील सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे या आकडेवारीवरून दिसत असून, रंगभूमीसाठीचे प्रेम आणि तळमळही वाढत असल्याचे निदर्शनास येते आहे. सर्व विजेत्या संघांचे आम्ही अभिनंदन करतो आणि ‘व्होडाफोन रंगसंगीत 2017’ ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सहभागी व्यक्तीने घेतलेल्या कष्टांचीही प्रशंसा करतो.’
थिएटर एकॅडमीचे प्रसाद पुरंदरे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत ‘व्होडाफोन रंगसंगीत’ या स्पर्धेची महाराष्ट्र आणि गोव्यातील नाट्यकर्मींकडून प्रशंसा होत आहे. गेल्या काही स्पर्धांतील काही सहभागी कलाकारांनी पुढे जाऊन मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगांमध्ये प्रसिद्धीही मिळवली आहे. मराठी रंगभूमीवरील उभरत्या कलाकारांना संगीत नाटकासारखा आव्हानात्मक नाट्यप्रकार नव्या संकल्पना आणून पेलण्यासाठी प्रोत्साहन देणे, असा ‘व्होडाफोन रंगसंगीत’चा उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या आणि व्होडाफोनच्या सातत्यपूर्ण सहकार्याच्या जोरावर हे व्यासपीठ आणखी मोठे करण्याचा आमचा मानस आहे.’
भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन आणि थिएटर एकॅडमीच्या वतीने आयोजिण्यात येणारी ‘व्होडाफोन रंगसंगीत’ ही राज्य स्तरावरील एकमेव अशी संगीत आणि गद्य एकांकिका स्पर्धा आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील उभरत्या नाट्यकलाकारांना व्यासपीठ देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. व्होडाफोन रंगसंगीत स्पर्धेच्या आठव्या आवृत्तीसाठी सप्टेंबरमध्ये प्रवेशिका मागविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, गोवा, कणकवली, रत्नागिरी आणि पुणे येथे प्राथमिक फे-या पार पडल्या. या दोन महिने चाललेल्या निवड प्रक्रियेतून सहा केंद्रांवरील 100 हून अधिक संघांपैकी संगीत नाटक विभागात सात आणि गद्य एकांकिका विभागासाठी सहा असे 13 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले.