तज्ज्ञ आणि भागधारकांबरोबर काम, लवकरच उपाययोजना – आजगांवकर
पणजी – पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी आज गोव्यातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची चिंता दूर करत राज्यातील पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा लवकरच लागू करणार असल्याचे सांगितले. यावेळेस त्यांनी सर्व भागधारकांना यासंदर्भात गोवा सरकारला सहाकार्य करण्याचे आवाहन केले.
मनोहर आजगांवकर म्हणाले, ‘आज पर्यटन क्षेत्रातील भागधारकांबरोबर फलदायी चर्चा झाली आणि मी गोव्यातील पर्यटन सुधारण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या सुचनांचे स्वागत करतो. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेत सर्व पर्यटन संघटनाआणि भागधारकांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे त्यावर काम केले जाईल. गोवा सरकार पर्यटन क्षेत्रातील भागधारकांबरोबर तसेच तज्ज्ञांबरोबर यासंदर्भातील समस्यांचा वेध घेत असून येत्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येत घट होण्यामागची कारणे शोधली जातील व त्यावर लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल.’
आजगांवकर म्हणाले, की ते गरजेप्रमाणे सरकारच्या इतर विभागांबरोबर म्हणजेच पोलिस व स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर काम करून गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण राखले जाईल याची खात्री करतील.त्यांनी भागधारकांना गोवा पर्यटनबरोबर काम करून गोव्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी विपणन धोरण आखण्यास मदत करावी असेही सांगितले.पोर्वोरिम येथे आज झालेल्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते, तर या बैठकीसाठी विविध पर्यटन संघटना, हॉटेलचालक आणि भागधारक उपस्थित होते. श्री. आजगांवकर यांनी या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्व समस्या तसेच व्यापारी संघटना आणि हॉटेलचालकांनी सुचवलेल्या उपाययोजना ऐकून घेतल्या. या उपाययोजनांमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता सुधारणे, विमानवाहतूकीचे प्रमाण वाढवणे, सार्वजनिक बससेवा सुधारणे, राज्य जलवाहिन्यांचा वापर करणे, पर्यटनाशी संबंधित आणखी उपक्रम, सवलती सुरू करणे यांचा समावेश होता.
पर्यटन भागधारकांनी आजगांवकर यांना पर्यटकांना विविध पातळ्यांवर दिला जाणारा त्रास तसेच छळवणुकीवर मार्ग काढण्याची विनंती केली. छळवणुकीच्या या प्रकारांमध्ये पर्यटन स्थळी भिकाऱ्यांनी संघटितपणे पर्यटकांना त्रास देणे, स्थानिक कंपन्यांद्वारे अवास्तव टॅक्सी शुल्क आकारले जाणारे, जास्त जीएसटी, पर्यटन स्थळी पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी व त्यांची दुरवस्था, दाबोलिम येतथे उशीराच्या विमानांसाठी दीर्घकालीन पार्किंग समस्या, व्हिसाचे अवास्तव शुल्क, व्हिसा शुल्कावर पेबॅक सवलतींची गरज, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी सवलती सुरू करण्याची गरज इत्यादींचा समावेश होता.
ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाने (टीटीएजी) श्री. सॅव्हिओ मेसियास यांच्या नेतृत्वाखाली श्री. आजगांवकर यांना गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित अहवाल लवकरात लवकर दाखल करण्याचे आश्वासन दिले. या अहवालामुळे सरकारला समस्या हाताळण्यासाठी मदत होणार असून श्री. आजगांवकर यांनी यावेळेस पर्यटन भागधारकांना सरकारबरोबर एकत्रितपणे काम करून गोव्यातील पर्यटन उंचावण्याचे आश्वासन दिले.
गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे सचिव श्री. संजीव गडकर, श्री. राजेश काळे, उपसंचालक, पर्यटन विभाग, श्री. गॅव्हिन डायस, व्यवस्थापक – जीटीडीसी आणि राज्य स्तरीय विपणन आणि प्रसार समितीचे सदस्य, श्री. नंदन कुडचडकर आणि श्री. अभिजित वाळके यावेळेस उपस्थित होते.