स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा
नागरिकांसाठी आरोग्य तपासणी केंद्रे
सुरू करा :माजी उपमहापौर आबा बागुल
पुणे –स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या शाळांसह शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी तसेच नागरिकांसाठी विविध ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्रे तातडीने सुरू करावीत अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि , यंदाही स्वाईन फ्लूचा उद्रेक वाढला आहे. ५० नागरिक स्वाईन फ्लूचे बळी पडले आहेत. जीवघेण्या स्वाईन फ्लूचा वाढता उद्रेक पाहता उपाययोजनांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिकेच्या शाळांसह शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून अत्यावश्यक औषधोपचार करणे अनिवार्य आहे.
पालिकेच्या राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे .त्यानुसार सर्वच शाळांमध्ये तातडीने आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी विशेषतः स्वाईन फ्लूची तपासणी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र तातडीने सुरु करावीत जेणेकरून स्वाईन फ्लूबाधित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन या आजाराला आळा घालणे शक्य होईल.